Followers

Monday, 24 April 2017

A

*प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचा नृसिंहवाडीशी ऋणानुबंध*

प. पू. टेंबेस्वामी महाराजानी नृसिंहवाडी मुक्कामी प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्या नुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता- भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग प. पू. गुळवणी महाराजाना देखील ओवाळत असत. प.पू. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत. एका गुरुव्दादशीस ओवाळणीसाठी प.पू. गुळवणी महाराजांकडील पाचशे रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे पाचशे सुवासिनीनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले !

प.पू. योगिराज गुळवणी महाराज बालपणापासूनच नृसिंहवाडीस येत होते. नृसिंहवाडीतील त्यांचा दिनक्रम - पहाटे उठून कृष्णेचे स्नान करणे, श्री चरणांवर पाणी घालणे, माधुकरी मागणे, अनुष्ठान, महापूजा करणे, श्रीदत्तप्रभूंची यथाशक्ती सेवा करणे, अन्नदान करणे इत्यादि ते अंत:करणपूर्वक समर्पित भावनेने आनंदाने करीत असत.

परमपूज्य गुळवणी महाराजांचे नित्य कर्म

एकदा तर देवस्थान समितीने वाडी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला श्री स्वामीच्या चरणावर पाणी घालण्यासाठी बंदी केली होती. प.पू. गुळवणी महाराजाना ही बंदी म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागली. त्यांनी आपल्या मनातील ही खंत पुजारीजनांना बोलून दाखविली. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूनी पुजाऱ्यांना विचार प्रवृत्त करायला लावून प.पू. गुळवणी महाराजाना या कठीण नियमातून मुक्त करून आपल्या पादुकांवर पाणी घालण्याची इच्छा पूर्ण करुन घेतली. या बाबतीत पंडित श्री. आत्माराम शास्त्री जेरे पुजारी यांनी पुढाकार घेऊन प.पू. गुळवणी महाराजांची श्री पादुकावर पाणी घालण्याची नित्य सेवा अबाधित ठेवली. या वरुन श्रीदत्तप्रभूंचा प.पू. गुळवणी महाराजांवरील लोभच दृष्टोत्पत्तीस येतो. नरसोबावाडीस असताना प.पू. योगीराज गुळवणी महाराज रोजच्या पहाटेच्या काकड आरतीला न चुकता उपस्थित रहात. देवासमोरच्या खांबा जवळची जागा एक शिंपी न चुकता त्यांच्यासाठी धरुन ठेवत असे. त्या खांबा जवळून प.पू. गुळवणी महाराजाना दरवाजा उघडल्यावर श्री दत्तप्रभूंचे अगदी व्यवस्थित दर्शन घडत असे. त्या शिंप्यास ते प्रतिवर्षी धोतर जोडी प्रसाद म्हणून देत असत.

प.पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या मनी मानसी अहर्निश नृसिंहवाडीच वसली होती. कारण प्रत्येक वेळी वाडीस येताना पाट्याभरुन पिवळी शेवंतीची फुले ते श्रीचरणांवर अर्पण करण्यासाठी घेऊन येत असत. वाडीस असताना कित्येक वेळा पार्सलने देखील त्यांनी पिवळी शेवंती मागवून घेतली होती. नृसिंहवाडीहून कोणी व्यक्ती आली किंवा पुण्याहून कोणी वाडीस जाणारी व्यक्ती भेटली तर त्याच्याबरोबर प.पू. गुळवणी महाराज पिवळ्या शेवंतीची हाराभर फुले न चुकता पाठवत असत. सर्व काही आपल्या लाडक्या आराध्य दैवतासाठी !

स्वारींच्या पोशाखातील जरीची पगडी देखील प.पू. गुळवणी महाराजांनी मापा प्रमाणे बनवून वाडीस श्री स्वारींच्या सेवेस पाठवून दिली होती. देवासाठी उत्तमतेचा ध्यासच जणू प.पू. गुळवणी महाराजानी घेतला होता ! वाडीस दरवर्षी गुरुव्दादशीस जाताना श्री दत्त प्रभूना अर्पण करण्यासाठी उत्तम छाट्या बेळगांव, धारवाडच्या हातमाग वाल्यांकडून ते मागवून घेत. श्री दत्त प्रभूना अर्पण करण्याचे उत्कृष्ट केशर ते थेट काश्मिरहून मागवून घेत असत.
   
    ।। श्री गुरुदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment